शारिरीक व मानसिक निरोगी राहायचे असेल तर शरीराला व्यायाम आवश्यक : अंकुश शिंदे
‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते गौरव
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी घेण्यात आलेल्या ‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते बक्षिस देवुन सन्मानित करण्यात आले आहे.
हि स्पर्धा (ता.२६) फेब्रुवारी ते (ता.२७) एप्रिल २०२२ दरम्यान घेण्यात आली होती. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी रावसाहेब जाधव तसेच विजेचे स्पर्धक उपस्थित होते.
पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. या संकल्पनेतुन अशा स्पर्धेचे आयोजन केले जात असते. १००० किलोमीटर सायकल चालविणे आणि ३०० किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरुप असते.
पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एकुण २१९४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला होता. सहभागी स्पर्धकांपैकी एकुण ९४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्पर्धा यशस्वी पूर्ण केली. ४४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी १००० किलो मीटर सायकल चालवुन स्पर्धा पूर्ण केली आहे. तर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ३०० किलोमीटर धावत स्पर्धा पूर्ण केली आहे. विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कौतुक केले. विजेत्यांना स्मार्ट गिअर सायकल बक्षिस स्वरुपात वाटप करुन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
या प्रसंगी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “ पोलीस अधिकारी व अंमलदार हे फ्रन्ट वॉरिअर भूमिकेत असतात. अहोरात्र समाजाची सुरक्षितता व लोकांच्या सेवेसाठी ते आपले कर्तव्य बजावत असतात. अशा वेळी आपल्या स्वास्थाकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. शारिरीक व मानसिक निरोगी राहायचे असेल तर शरीराला व्यायाम आवश्यक आहे.”
दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविलेल्या विविध उपक्रमाचे तसेच गोकी स्मार्ट बॅन्ड या कंपनीच्या आयोजकांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी विशेष कौतुक केले.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, महिला पोलीस उप-निरीक्षक स्वाती लामखेडे, महिला पोलीस हवालदार सुरेखा देशमुख, पोलीस अंमलदार विनायक विधाते यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या करिता अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करुन सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल पोलीस आयुक्तालय प्रति आभार व्यक्त करीत स्वतःचा अनुभव कथन केला.