पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १६) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सिधी, डाल्टनगंज, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, आग्नेय राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (ता. १८) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा, विदर्भासह राज्यात हलका ते जोरदार पाऊस पडत आहे. उद्या (ता. १६) कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्यकडे सरकणारी ही प्रणाली परत मागे फिरून उत्तर प्रदेशकडे जाण्याचे संकेत आहेत.
(यलो अलर्ट) : पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूर.