पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 761 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आलीय. या परीक्षेत बिहारचा ल आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार देशात पहिला आलाय. शुभमनं परीक्षेत अव्वल आल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. शुभम हा मूळचा कटिहार जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तो पुण्यात भारतीय संरक्षण लेखा सेवांसाठी प्रशिक्षण घेत आहे.
गेल्या वर्षी शुभमला यूपीएससी परीक्षेत 290 वी रँक मिळाली होती. त्यानंतर त्याची भारतीय संरक्षण लेखा सेवेसाठी निवड झाली. आता सध्या तो पुण्यात प्रशिक्षण घेत आहे. शुभम हा 24 वर्षांचा असून त्यानं तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान मिळवलंय. शुभमनं सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर 2018 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली. 2018 मध्येच त्यानं आयआयटी मुंबईतून स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं.
शुभमनं पहिल्यांदा 2018 मध्ये UPSC परीक्षा दिली होती, पण त्यात तो यशस्वी झाला नाही. नंतर 2019 मध्ये त्यानं दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली. ज्यात त्याला 290 वी रँक मिळाली आणि नंतर भारतीय संरक्षण लेखा सेवेसाठी त्याची निवड झाली. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत त्यानं मानवशास्त्र हा पर्यायी विषय ठेवला होतो, असं तो सांगतो. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करून शुभमचं अभिनंदन केलंय.
बिहारचे उपमुख्यमंत्री तार किशोर म्हणाले, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ग्रामीण भागातून बाहेर आल्यानंतर, ज्या प्रकारे शुभम यूपीएससीत टॉप आला, ही खरंच बिहारच्या जनतेसाठी प्रेरणादायी बाब आहे. आम्ही त्याच्या पालकांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो, असं त्यांनी गौरवोद्गार काढलेत. शुभमचे आई-वडील, एक बहीण आणि सर्व कुटुंबीय कटिहारमध्ये (बिहार) राहतात. त्याचे वडील उत्तर बिहार ग्रामीण बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
शुभमनं सांगितलं, की त्यानं कधीच अशी अपेक्षा केली नव्हती, की तो यूपीएससी परीक्षेत अव्वल येईल. एवढचं काय तर त्याचं नाव देखील यादीत येईल की, नाही याची देखील त्याला खात्री नव्हती, पण परमेश्वराच्या आशीर्वादामुळं आणि कुटुंबाच्या आशीर्वादामुळं त्यानं हा पराक्रम केल्याचं तो सांगतो.
शुभमनं विद्या विहार निवासी शाळा, पूर्णियामधून 10 वी पूर्ण केली आणि चिन्मय विद्यालय बोकारोमधून तो 12 वी उत्तीर्ण झाला. शुभमनं 2018 मध्ये आयआयटी मुंबईतून स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. शुभमनं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कुटुंबातील सदस्यांशी बोलून त्यानं यूपीएससीची तयारी सुरु केली. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानं नोकरीच्या मागे न लागता आपलं संपूर्ण लक्ष यूपीएससीच्या अभ्यासावर केंद्रीत केलं. आता आयएएस झाल्यानंतर त्याला लोकांसाठी काम करायचंय आणि समाजासाठी अधिकाधिक वेळ द्यायचाय, असंही तो सांगतो.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 15 वर्षांत बिहारचं चित्र बदललंय आणि विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही खूप सुधारलीय. बिहार प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असून येथील युवकांसाठी भरपूर संधी आहे, असंही शुभमनं शेवटी सांगितलं.