मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर असलेलं मोठं झुंबर पीओपी स्लँबसह कोसळलं. अपघात झाला तेव्हा आदित्य ठाकरे आत बैठक घेत होते. त्यामुळं या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी सायंकाळी बैठकीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृहामध्ये आले होते.
याठिकाणी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर सभागृहात त्यांची बैठक सुरू होती. मात्र आतमध्ये ही बैठक सुरू असताना बाहेरच्या भागात असलेलं शोभेचं मोठं झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र ही दुर्घटना अत्यंत गंभीर होती. त्यामुळं सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
दरम्यान, अपघात झाला त्याठिकाणचं बांधकाम हे 25 वर्षांपूर्वीचं आहे. या सर्व इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, संबंधित दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं आहे.