जमावबंदी असताना देखील कुंडमळ्यावर पर्यटक; पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
पोलीस महासंचालक, पालकमंत्री, जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी जाण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच आशा ठिकाणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यातच पोलीस महासंचालकानी पिंपरी येथे आमचे पोलीस थंड नाहीत, पर्यटनस्थळांवर गर्दी दिसणार नाही, असे गृहमंत्र्यांच्या समोर सांगितले होते. मात्र याला प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळ्यावर रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. याच ठिकाण एका पर्यटक युवकाचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला. ही घटना घडत असताना इतर पर्यटक मात्र वाहत्या पाण्यात भिजण्यात मशगुल होते. कुंडमळ्यावर ऐवढी गर्दी झालेली असताना पोलीस आणि इतर प्रशासन मात्र यापासून अनभिज्ञ होते.
जिल्हाधिकारी पुणे यांनी शुक्रवारी मावळातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी लागू केली तसेच धरण व धबधबे परिसरातील एक किलो मिटर परिसरात वाहनांना प्रवेशबंदी असताना देखील पोलीस प्रशासन असो व स्थानिक प्रशासन यांनी आदेशाचे पालन करण्याचे कोणतेही नियोजन न केल्याने कुंडमळ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
याच ठिकाणी एका 21 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आपल्या सहा मित्रांच्या सोबत पर्यटनासाठी येरवडा येथून आलेल्या 21 वर्षीय करण हंबीर या युवकाचा पाण्यात पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. संबंधित घटना काही स्थानिक ग्रामस्थांनी पाहून पाण्यात उड्या टाकल्या. त्याच बरोबर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेत तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. मात्र तो प्रयत्न करण याचा मृत्यू झाला होता. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
पालकमंत्री अजितदादा पवार हे मागील दोन आठवड्यांपासून पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लावा, नियम मोडणार्यांवर कारवाई करा अशा सूचना प्रशासनाला देत आहेत. तर पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जमावबंदीचे कलम 144 लागू केलेले असताना या दोघांच्या आदेशाला पर्यटकांनी पायदळी तुडवले असल्याचे चित्र आज रविवारी कुंडमळ्यावर पहायला मिळाले.
शनिवारी राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांनी पिंपरी पोलीस आयुक्तालयास भेट दिली. त्यावेळी लोणावळा आणि इतर पर्यटन स्थळांवर होणाऱ्या गर्दीबाबत चर्चा झाली होती. आम्ही संयमानी घेतो म्हणजे पोलीस थंड नाहीत; यापुढे पर्यटन स्थळांवर गर्दी दिसणार नाही असे पत्रकारांना सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी किती गांभीर्याने घेतले हे स्पष्ट होत आहे.
आदेशाचे पालन न करणार्या काही पर्यटकांवर कारवाई केली जाते. मात्र आपल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या, आदेशाची अंमलबजावणी न करणार्या अधिकार्यांचे काय? असा प्रश्न स्थानिकानी उपस्थित केला आहे.