पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. पिंपरीतील साई चौकात व्यापा-यांनी या निर्णयाचा विरोध केला. तसेच निदर्शने केली.
शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 7 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
याविरोधात पिंपरी कॅम्प मेन बाजार येथील व्यापा-यांनी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यापूर्वीच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी अगोदरच आर्थिक संकटात आहे. बाजारात ग्राहक कमी आहेत. त्यात आता पुन्हा निर्बंध कडक केले आहेत.
व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे प्रतिनिधी म्हणून माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी आदी उपस्थित होते.
दुकाने तब्बल महिनाभर बंद ठेवण्यास सांगितले. यामुळे व्यापारी आणखीन संकटात जातील. दुकाने बंद असल्यावर भाडे, बँकांचे हप्ते, कामगारांचा पगार, वीज बील कसे भरणार, असा सवाल व्यापा-यांकडून उपस्थित केला जात आहे.
आम्ही कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापा-यांकडून केली जात आहे.