पुणे : सलग सुट्ट्या आल्याने शहरातील नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. शुक्रवार पासूनच नागरिकांनी गोवा, कोकणात जाण्यासाठी खासगी वाहनाने काढली आहेत. यामुळे पुणे -मुंबई एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली असून टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पर्यटनस्थळावर नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन करूनही नागरिकांनी याला प्रतिसाद दिला नसल्याचे दिसत आहे. एक्स्प्रेस हायवे प्रशासनाच्या माहितीनुसार, खोपोलीकडे वळणाऱ्या मार्गावर तसेच बोरघाटात वाहतुक कोडींसह वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक कासवगतीने सुरू आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन तैनात करण्यात आले असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतील, असे सांगण्यात आले. शुक्रवार 25 डिसेंबर, 26 आणि 27 डिसेंबरला शनिवार रविवार आल्यामुळे सलग तीन दिवसांचा प्लॅन करून पर्यटकांनी कोकण, गोव्यासह मुंबईला जाणे पसंत केले.
परंतु, आज सकाळी विकेंडसाठी पुण्याच्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस हायवेच्या दुतर्फा मार्गांवर वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. लोणावळा-खंडाळा येथील घाटातही वाहतूक कोंडीमुळे संथगतीने वाहतूक सुरू आहे. खालापूर टोलनाक्यावर तर वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.