पुणे : शहरात शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून संचार मनाई आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली. सायंकाळी ठिक सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कारवाईच्या भितीने शहरातील बहुतांश व्यवहार बंद झाले, त्यानंतर चाकरमान्यांची घरी परतण्यासाठी एकच घाईगडबड सुरू झाल्याने बहुतांश मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसू लागली. मात्र रात्री आठ नंतर शहरात शुकशुकाट पसरला होता.
शनिवारी दिवसभर नोकरदार, कामगार, कष्टकऱ्यांना सायंकाळी काम लवकर आटोपून घरी जाण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. शहरात शनिवारपासून सात दिवसांसाठी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत नागरीकांना संचार मनाई आदेश करण्यात आल्याचे महापालिका व पोलिस प्रशासनाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले होते. त्याचे पडसाद शुक्रवारी सायंकाळपासूनच उमटण्यास सुरूवात झाली होती. दुपारी चार वाजल्यापासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली. सायंकाळी सहा नंतर संचार मनाई आदेश लागू होत असल्याने, तसेच पोलिसांचा ससेमीरा पाठीमागे नको, म्हणून नागरीकांचा लवकरात लवकर घरी पोचण्याकडे कल होता.
संचार मनाई सुरु झाल्यानंतर मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी करण्यास सुरूवात केली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहतुक पोलिस कर्मचारी नाकेबंदीच्या ठिकाणी थांबले. सायंकाळी सात वाजल्यानंतर पोलिसांकडून नागरीकांकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. नागरीकांचे बाहेर पडण्यामागील कारण, ओळखपत्र, पत्र, वैद्यकीय कागदपत्रे तपासून सोडले जात होते.
संचार मनाई सुरू असल्याने नागरीकांनी सबळ कारणाशिवाय बाहेर पडू नये, रात्रीच्यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची वाहतुकीच्यादृष्टीने गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महापालिकेने काढलेल्या आदेशामध्ये अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे योग्य कारण असलेल्या नागरीकांना पोलिसांकडून सहकार्य होईल. परंतु विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त