वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना ‘पीसीएमसी’ ला हस्तांतरित करा!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची बैठकीत आग्रही मागणी
पिंपरी : वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर केलेल्या ३० दशलक्ष लीटर कोट्यासह पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी पिंपरी- चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर सौ हिरानानी घुले, आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेची सध्याची लोकसंख्या सुमारे २८ लाख एवढी आहे. सद्यस्थितीत शहरासाठी पवना नदीतून सुमारे 50 दशलक्ष लीटर (एमएलडी) इतके पाणी उचलले जाते. शहराची लोकसंख्या व उंचसखल असलेली भौगोलिक परिस्थिती विचारात घेता शहरात पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी मोठया प्रमाणात प्राप्त होत आहेत. त्यामुळे शहरात वाढीव पाण्याची नितांत आवश्यकता आहे.
पुणे महानगरपालिकेकडील भामा-आसखेड योजना कार्यान्वित झाली असून, सदर योजनेतून त्यांना २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन इतका वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. पुणे महानगरपालिकेकडून वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीतून 30 दशलक्ष लीटर प्रतिदिन इतके पाणी घेतले जात जाते. वाघोली योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र मौजे चिखली येथे असून तेथून वाघोली परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
पुणे महापालिकेस सध्या खडकवासला, वरसगाव, टेमगाव, पानशेत, भामा भासखेड या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेस सध्या फक्त पवना नदीतून ५०० दलली प्रति दिन पाणी देण्यात येत असून, आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६० दलली पाणी कोटा मंजूर करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून यापुढे या महापालिकेस वाढील पाणी कोटा मिळण्यासाठी नजीकचा भविष्यात कोणताही स्रोत उपलब्ध नाही, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
समाविष्ट गावांसह शहरातील पाणी पुरवठा सक्षम होईल…
पिंपरी- चिंचवडमधील पाण्याची सध्यस्थीती लक्षात घेता वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना ३० दललि कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित केल्यान २८ दशलक्ष लीटर प्रति दिन पाणी उपलब्ध होऊन च-होली, मोशी, डुडुळगाव, दिघी या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागाच्या पाणीपुरवठा विषयक अडचणी सुटण्यास तसेच शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. त्यामुळे या मागणीबाबत सकारात्मक विचार करून सदरील योजना महापालिकेकडे हस्तांतरित करावी. सदर प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत करण्यात येईल, या आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पिंपरी चिंचवड मधील उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी समर्थन दिले