पिंपरी : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या धुरात अडकून पडलेल्या आठ जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढली. ही घटना शुक्रवारी (दि. २९) पहाटे मोशी येथे घडली.
अमोल प्रभाकर करके (४०), अमिता अमोल करके (३६), खंडप्पा सुभाष गोवे (४४), कीर्ती खंडाप्पा गोवे(३६), बोंगरंगे श्रीकृष्ण (३३), ज्योती गव्हाणे (३६), आकांशा करके (०८), अनुज करके (०६, सर्व रा. “कृष्ण कुंज”, मोशी प्राधिकरण) अशी अग्निशामक दलाने सुटका केलेल्या नागरिकांची नावे आहेत.
शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास नागेश गव्हाणे यांनी आगीबाबत अग्निशामक दलास माहिती दिली. त्यानुसार अग्निशामक मुख्यालय आणि भोसरी उपकेंद्रातून आगीचे बंब घटनास्थळी रवाना झाले.
कृष्णकुंज या इमारतीच्या जिन्याजवळ असलेल्या मीटर बॉक्स, इन्वर्टर आणि बोरवेल पॅनलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीचे स्वरूप मोठे नसले तरी वायरचा धूर जिन्यामार्गे इमारतीत पसरला. थंडीमुळे येथील नागरिकांनी खिडक्या बंद केल्या होत्या. त्यामुळे धुराला पसरण्यास जागा राहिली नाही. यामुळे इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील आठ लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच जिन्यात मोठ्या प्रमाणात साठलेल्या धुरामुळे खाली देखील उतरता येत नव्हते.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शिडी व श्वसन यंत्राचा वापर करून घरातील व्हेंटिलेशनचे मार्ग मोकळे केले आणि इमारतीमधील आठही जणांना सुखरूप बाहेर काढले.