‘स्पेशल 26’ चित्रपटाप्रमाणे सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात थरार
दरोडा, अपहरण करुन लुटलेला एक कोटी 63 लाखांचा ऐवज जप्त
चिपळूण : चिपळूण येथील ओतरी गल्लीत असणाऱ्या सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे बनावट ‘अँटी करप्शन’च्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. दुकानातील 3 किलो सोन्याचे दागिने आणि 9 लाख रुपये असा एकूण एक कोटी 59 लाखाचा ऐवज लुटला. तसेच व्यवसायिकाला बेड्या घालून, जबरदस्तीने गाडीत घालून नेले.
रत्नागिरी पोलिसांनी तपास करुन पुण्यातील, पिंपरी-चिंचवडच्या टोळीला अवघ्या 12 तासाच्या आत अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी 62 लाख 85 हजार 200 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; अश्रफ शेख या व्यवसायिकाचे चिपळूण येथील ओतरी गल्लीत सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. 6 मार्च रोजी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास त्यांच्या दुकानात सुटा-बुटात पाच जण आले. आम्ही ‘अँटी करप्शन’ पालघर येथून आलो आहे. तुमच्याकडील बेकायदेशीर सोने आणि पैसे याची चौकशी करायची आहे, असे सांगून तपास सुरु केला. त्यावेळी शेख यांनी कारखान्यात असणारे सोन्याची लगड, कॉइन आणि 9 लाख रुपये दाखवले.
या बनावट अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी ते सर्व घेतले आणि शेख यांना बेड्या घालून गाडीत बसवले. याचा संशय आल्याने याबाबतची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती पोलीस अधिक्षकांना देण्यात आली. तत्काळ अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली.
दरम्यान चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी यांना या टोळीची माहिती मिळाली. ही टोळी पुण्यातील असल्याची समजले. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसातील गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक हरीष माने व त्यांच्या पथकाने आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेतले आणि रत्नागिरी पोलिसांच्या स्वाधीन केले.
विशाल रावसाहेब ओहळ (34, रा. पिंपरी कॅम्प), नरेश दिलीप मोहिते (28, रा. पिंपरी-चिंचवड), अजय राजू महाजन (26, रा. पिंपळे सौदागर), रासबिहारी मिताई मन्ना (38, रा. बंगाल), असीम करमुद्दीन परकार (50, रा. चिपळूण) आणि एकनाथ कृष्णा आवटे (60, रा. शिरूर, पुणे) या सहा जणांना अटक केली. अटक केलेल्या सहाजणांकडून दीड कोटी रुपयांचे सोन्याचा ऐवज, सात लाख 84 हजार 500 रुपयांची रोकड, एक दुचाकी, एक कार, एक बेडी आणि एक एयर गन असा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग, अप्पर अधीक्षक जयश्री देसाई, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी, रत्नदीप साळोखे या पथकाने केली आहे. तपासी पथकास 25 हजराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.