अहमदनगर : काहीही झाले तरी आम्ही शिर्डीत जाणारच असे म्हणत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावली आहे. त्यामुळे शिर्डीतील साईमंदिरात लावलेल्या बोर्डावरुन आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये’, असे आवाहन साई संस्थानने केलेले आहे. साई मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहेत. साई संस्थानच्या याच आवाहनावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी साईबाबा मंदिरातील तो बोर्ड काढण्याची मागणी केली आहे. तसेच, साई संस्थानने तो बोर्ड काढला नाही, तर स्व:त जाऊन त्या बोर्डाला हटवण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे.
दरम्यान, आठ दिवस झालेले असूनही शिर्डीतील तो बोर्ड हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे देसाई यांनी शिर्डीला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्या गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता पुण्याहून शिर्डीला जाणार आहेत. यावर बोलताना, “आठ दिवस झाले तरी साई संस्थानने ड्रेसकोडचा बोर्ड काढलेला नाही. अशा परिस्थितीत आम्हाला नोटीस बजावून शिर्डीत येण्यास प्रतिबंध केला जातो. लोकशाहीत आवाज दाबला जात आहे. तरी आम्ही शिर्डीत जाणारच.” अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.