देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचारावर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून देशात मोठा वादंग निर्माण झाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली असून त्या माध्यमातून प्रपोगंडा राबवत असल्याचा आरोप सरकारने केला आहे.
या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठांसह महाराष्ट्रातील एफटीआय आणि टीसमध्ये उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा वाद झाला. याच वादावर भाष्य करताना सध्या देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एनसीसीच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले.
दिल्लीतील राष्ट्रीय छात्र सेनेच्या ट्रूपसमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्या देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपण सर्वांना सावधगिरी बाळगण्याची गरज असून फूट पाडणार्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाही. अनेक लोक भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु एकता हीच भारताची ताकद असल्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीबीसीचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
बीबीसीच्या पहिल्या भागातील महितीपटात गुजरात दंगलीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. यातील दुसर्या भागात 2014 नंतर देशातील अनेक शहरांमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांसाठी सरकारला जबाबदार धरण्यात आलं आहे. यानंतर बीबीसीच्या डॉक्युमेंट्री हा प्रपोगंडा असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने यावर भारतात प्रदर्शनावर बंदी घातली आहे.