तुळापूर, वढू बुद्रुक विकासासाठी दीडशे कोटींचा आराखडा

0

मुंबई : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसरचाही विकास करण्यात येईल. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिला.

महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक हौतात्म्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन वंदन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज हे, महाराष्ट्राची अस्मिता, अखंड महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक कार्य, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. महाराष्ट्र धर्माचं, स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांना, एकावेळी अनेक शत्रूंचा, अनेक आघाड्यांवर सामना करावा लागला.

ज्ञान, गुण आणि चारित्र्यानं संपन्न असलेल्या संभाजी महाराजांनी हा सामना मोठ्या धैर्यानं केला. छत्रपती संभाजी महाराज इतके शूर, पराक्रमी होते की, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातला एकही किल्ला, स्वराज्याची एक इंच जमीन शत्रूकडे जाऊ दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला. संभाजी महाराज स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं, जागतिक दर्जाचं, भव्य, प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या ऐतिहासिक तुळापूर गावात, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा देह ठेवला, अखेरचा श्वास घेतला. तुळापूरपासून जवळ, शिरुर तालुक्यातल्या, वढु बुद्रुक गावी, छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वढू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याठिकाणी आपला देह ठेवला, जिथं महाराजांनी अखेरचा श्वास घेतला, त्या ऐतिहासिक तुळापूर गावाचा, तसंच, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची संमाधी आहे, त्या वढु बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, पराक्रमाचा, ज्ञान, गुण, चारित्र्यसंपन्नतेचा, स्वराज्यभक्तीचा इतिहास सांगणारं, जागतिक दर्जाचं, भव्य स्मारक, वढू बुद्रुक इथं, महाराजांच्या समाधीस्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे.”

“छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जण तूळापूर आणि वढू बुद्रुकला भेट देतात. या सगळ्यांसाठी हे स्मारक केवळ पर्यटनस्थळ असणार नाही तर, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन, अभिवादन करण्यासाठी वढू बुद्रुकला येणाऱ्या प्रत्येकासाठी, हे स्मारक प्रेरणादायी, स्फुर्तीदायी ठरावं, असा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं हौतात्म्य हा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, गौरवशाली इतिहास आहे. या हौतात्म्याला इतिहासात जाज्वल्य राष्ट्राभिमानाची किनार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानं, महाराष्ट्राच्या मावळ्यांमधली स्वराज्यरक्षणाची भावना तीव्र झाली. प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी पेटून उठला. स्वराज्यासाठी लढण्यास सिद्ध झाला. संभाजी महाराजांच्या, बलिदानानं मावळ्यांना लढण्याची, जिंकण्याची ताकद, प्रेरणा दिली. या बळावर, नंतरच्या काळात, स्वराज्याच्या मावळ्यांनी, औरंगजेबासह, स्वराज्याच्या शत्रूंविरुद्ध निकरानं लढा दिला. स्वराज्याच्या शत्रूंना जेरीस आणलं. सळो की पळो करुन सोडलं. मावळ्यांच्या हल्ल्यांपुढे खुद्द औरंगजेब सुद्धा थकला, आणि महाराष्ट्राच्या याच मातीत त्याची अखेर झाली. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, स्वराज्याचा गौरवशाली इतिहास असलेल्या, छत्रपती संभाजी महाराजांचं वढू बुद्रुक इथं भव्य, दिव्य, जागतिक दर्जाचं स्मारक व्हावं. वढु बुद्रुक आणि तूळापूर या ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा, राज्य शासनाचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे. या स्मारकाच्या उभारणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा, पराक्रमाचा खराखुरा इतिहास सर्वांपर्यंत, विशेषत: भावी पीढीपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी स्मारकाची रुपरेषा सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे असलं पाहिजे. त्याला इतिहासाशी साधर्म्य सांगणारा ‘हेरिटेज’ टच असला पाहिजे. स्थानिक ग्रामस्थ, इतिहासतज्ञ आणि संबंधीत सर्वांशी चर्चा करुन स्मारकाचा आराखडा ठरवण्यात येणार आहे. स्मारक जागतिक दर्जाचं व इतिहासाप्रमाणं होण्यासाठी, स्मारक आराखड्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करुन स्मारकाचं बांधकाम केलं जाईल.

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला जागतिक दर्जाचं प्रेरणास्थळ बनविण्यासाठी, अनेक विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. वढू बुद्रुक गावातील मुख्य प्रवेशद्वार हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा वाटतील अशा दगडामध्ये बांधकाम करणे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या समाधीस्थळाच्या भिंती व बुरुज इतिहासकाळास अनुरुप जसे होते, त्यापद्धतीनं बांधकाम करणे. ‘मावळा’ वीर शिवले यांच्या समाधीस्थळाचा विकास करणे. समाधीस्थळांची दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी कार्यालय व बहुद्देशिय सभागृह निर्माण करणे. भक्तनिवास बांधणे. समाधीस्थळाच्या मागील बाजूस ऐतिहासिक चित्रे रंगविणे. निवडक झाडांखाली पारंपारिक पध्दतीने पार बांधणे. वढू बुद्रुक गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करणे, नाले आणि जलस्त्रोतांची सुधारणा करणे. पूल आणि बंधाऱ्यांचा विकास करणे. वढू बुद्रुक गावात वाहुकीची कोंडी सोडवण्यासाठी परिघीय रस्ता (रिंगरोड) तयार करणे. वढू बुद्रुक येथील नदीवर घाट बांधणे. समाधीस्थळाजवळ बारा बलुतेदार (गावगाडा) ग्रामीण संस्कृती प्रदर्शनातून मांडणे.भविष्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा-सुविधा प्रदान करणे. आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत,” अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

“छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या आजूबाजूला जंगलातील झाडे लावण्यात येणार आहेत. डोंगराळ प्रदेशातील अंतर्देशीय सरोवरे व पाणवठ्यांमुळे चिंच, करंज, गोरखचिंच, तुती, आंबा, फणस, कवठ, कमरख, बोर, आसन अशाप्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यास वाव असल्याने तशा पद्धतीनं वृक्षारोपण करणं. ही झाडे त्या भागात प्रचलित असलेल्या परिसंस्थेसाठी अन्नाचे स्त्रोत बनतील. यासोबतच बांबूच्या झाडांच्या लागवडीमुळे दंडकारण्य विकसीत होईल. या शक्यतांव्यतिरिक्त देशी झाडांच्या लागवडीला, संगोपनाला चालना देण्यासाठी वनस्पती रोपवाटिकेचा विकास करणे. उपरोक्त विकास कामासाठी समाधीस्थळ व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम-योजना राबविण्यात येईल व त्यासाठी अंदाजे 150 कोटी रुपये इतका निधी आवश्यक असून तो टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.