मुंबई : बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात याआधी राज्य सरकारच्या नोकरभरतीत पेपरफुटी झाल्याचे समोर आले होते. आता, थेट बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला केमिस्ट्रीचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला याची माहितीदेखील पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे.