मुंबई : पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाची ऑर्डर बदलून देण्यासाठी आणि दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून करण्यासाठी 3 लाखाची लाच स्विकारताना मुंबई महापालिकेच्या के/पुर्व वार्ड भाडे संकलक अधिकारी व लेबर यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे मुंबई महापालिकेत खळबळ उडाली आहे. लाच घेतल्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता लाचेच्या रकमे व्यतिरिक्त 3 लाख रुपये आढळून आले. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.
भाडे संकलक राजेंद्र सहदेव नाईक (54) आणि लेबर मोहन रावजी ठिक (54) असे मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तक्रारदार यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांचे घरासमोर दुकान आहे. त्यांचे घर हे पत्नीच्या तर दुकान तक्रारदार यांच्या नावाने आहे. हे दुकान त्यांनी 1985 मध्ये एसआरए मधून रितसर फी भरुन स्वत:च्या नावाने कमर्शिअल करुन घेतले होते. यानंतर तक्रारदार यांनी 2020 मध्ये मुंबई महापालिकेतून एनेक्चर-2 काढले, यामध्ये त्यांच्या दुकानाची नोंद दिसुन आली नाही.
तसेच तक्रारदार यांची पत्नीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या सागबाग स्नेहनगर एसआरए सहकारी गृनिर्माण संस्थेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रकल्प अधिकारी (वसाहत) के/पूर्व, बीएमसी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीत पत्नीचे अपील नामंजूर करण्यात आले होते.
तसेच तक्रारदार यांनी दुकानासंदर्भात कागदपत्र जोडुन 6 जानेवारी 2022 रोजी अंधेरी के/पुर्व विभागात अर्ज केला होता.
भाडे संकलक राजेंद्र नाईक याने तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाबाबत ऑर्डर बदलुन देण्यासाठी आणि तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद कमर्शियल करुन पुर्ववत करण्यासाठी तीन लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई एसीबीकडे 18 फेब्रुवारी रोजी तक्रार केली. त्यानुसार 21 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली असता राजेंद्र नाईक याने तीन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी (दि.4) पथकाने सापळा रचून नाईक याच्या सांगण्यावरून लेबर मोहन ठिक याने तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारली. लाच स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर पथकाने राजेंद्र नाईक यांच्या कार्यालयाची झडती घेतली. त्यावेळी लाचेच्या रक्कमेव्यतिरिक्त 3 लाख रुपये रोख रक्कम सापडली. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी दिली.