पुणे : जिल्ह्यातील अनेक नामांकित डॉक्टरांना ब्लॅकमेल करुन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या सराईत महिलेसह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
रंजना तानाजी वणवे (३८) व सागर दत्तात्रय राउत (२४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रंजना वणवे सराईत गुन्हेगार आहे.
तिने खंडणी उकळण्यासाठी स्वतंत्र टोळी तयार केली होती. ही टोळी शहर व ग्रामीण भागातल्या प्रतिष्ठीत डॉक्टरांना लक्ष्य करीत होती. त्यानंतर डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचे काम करीत होते. असाच प्रकार हडपसर परिसरातील डॉक्टरसोबत घडला होता.
या प्रकरणी महिलेसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान या महिलेवर सोलापूर शहर पोलिसांनी देखील मोक्कानुसार कारवाई केली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर तिने पुन्हा डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यास सुरूवात केली होती. ती सोलापूरनंतर पुणे व जिल्ह्यात गुन्हे केले आहेत.
रंजना साथीदारासह फरार झाली होती. ती फलटणमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोघांना अटक केली.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक संतोष तासगांवकर, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.