पिंपरी : काटे पुरम चौकात गणेश मोटे आणि त्याच्या साथीदारांनी दत्त जयंतीच्या कार्यक्रमात भर दिवसा गोळीबार करून योगेश जगताप याचा खून केला. ही घटना 18 डिसेंबर 2021 रोजी सकाळी घडली. या गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप मोकाट होते. त्यांना गुन्हे शाखा युनिट चारने पवनेल नवी मुंबई येथून अटक केली. पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी विसाव्या मजल्यावरून ड्रेनेजच्या पाईपवरून उतरून पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
राजन ऊर्फ बबलु रवी नायर (रा. जुनी सांगवी, पुणे), निखील ऊर्फ डोक्या अशोक गाडुते (रा. जुनी सांगवी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 18 डिसेंबर 2021 रोजी दत्त जयंतीच्या कार्यक्रमा दरम्यान काटे पुरम चौकात मुख्य आरोपी गणेश मोटे याने त्याच्या साथिदारांसह मिळून भर दिवसा फायरिंग करून योगेश जगताप याचा खून केला. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हयातील आरोपी हे कुख्यात असून ते संघटीतरित्या गुन्हेगारी कृत्य करुन परिसरात दहशत पसरवून अर्थाजन करत असल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्हयात मोका कायदा लावून कलम वाढ करण्यात आली.
आरोपी गुन्हा केल्यानंतर पळून गेले. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन अटक केली. दरम्यान काही आरोपींनी थेट पोलिसांवर गोळीबार केला होता. त्यानंतरही आरोपी राजन आणि निखिल हे फरार होते. ते अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट चारला माहिती मिळाली की, हे आरोपी पनवेल येथे एका इमारतीत लपून बसले आहेत.
युनिट चारचे एक पथक पनवेल येथे रवाना झाले. कोनगाव परिसरात असलेल्या एका उंच इमारतीच्या 20 व्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये दोघे जण राहत होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने 9 मे रोजी पहाटेच्या वेळी पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या फ्लॅटच्या दारावर थाप मारली. पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने आरोपींनी इमारतीच्या 20व्या मजल्यावरील ड्रेनेजच्या पाईपवरून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना याची खबर लागताच 18व्या मजल्यावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले.