अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणात नगरमधून दोघांना घेतले ताब्यात
पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी
अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत तब्बल 22 कोटीच्या घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये तत्कालीन संचालकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे यांनी फिर्याद दिली आहे. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या काळात हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे केली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक केली होती. त्यानुसार कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी 6 जणांच्या विरोधात चिंचवड पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
कर्ज घेणाऱ्या यज्ञेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. तर बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.