मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड सेंटर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याचा हा आरोप केला होता. या प्रकरणी मंगळवारी दोन जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे सहकारी आणि पार्टनर असलेल्या सुजित पाटकर आणि त्यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने कोविड सेंटरच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्याचा तपास सुरू आहे. राजीव साळुंके आणि सुनील कदम यांना यात पोलिसांनी अटक केले आहे. या दोघांविरोधात भारतीय दंड विधान 420, 406, 465, 467, 468, 471, 304(A)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने दोन्ही आरोपींना 6 मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोरोना काळात मुंबई महापालिकेत 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल समोर आला होता. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात फोर्जरी झाली आहे, असे म्हटले होते. पण अहवालाच्या शेवटी कारवाई करायची गरज नाही, असा शेरा धामणे यांनी मारला होता. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.