पिंपरी : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला आहे.
किरण प्रभाकर गायकवाड (21, रा. सृष्टीचौक, पिंपळे गुरव), भूषण उत्तम सुरवसे (22, प्रभातनगर, पिंपळे गुरव) यांना अटक केली आहे. तसेच त्यांचा अल्पवयीन साथीदार (16) याला पोलिसांनी ताब्यात घतले आहे. सूर्यभान दगडू चोथवे (40, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास एका टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. वाहनांच्या काचा फुटल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
गुंडा विरोधी पथकाला तोडफोड करणाऱ्या एका आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी दोघांची नावे सांगितली. पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकजण अल्पवयीन आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली.
आरोपींचे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून मंगळवारी सायंकाळी भांडण झाले होते. ज्या तरुणांशी भांडण झाले होते त्यांना मारण्यासाठी आरोपी आले होते. मात्र ते मिळून न आल्याने त्या भांडण करणाऱ्या तरुणांच्या गाड्या आहेत, असे समजून आरोपींनी वाहनांची तोडफोड केली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. गुंडा विरोधी पथकाने आरोपींना सांगवी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.