पिंपरी : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोघांकडून मॅक्झीनसह दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे भोसरी पोलिसांनी जप्त केली आहेत. इंद्रायणी नगर येथे शनिवारी (दि. 5) दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली.
सनी उर्फ सोन्या सुरेश शिंदे (28, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव), तुषार नथुराम बच्चे (29, रा. शिवाजी वाडी, मोशी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी गणेश पंढरीनाथ सावंत यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याकडे बेकायदा शस्त्र असून ते इंद्रायणी नगर येथे ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारी येणार आहेत, अशी माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मॅक्झीनसह दोन पिस्तूल व चार जिवंत काडतुसे, असा 62 हजार रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.