नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रविवारी 2 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयांचे 10 बोगस स्टॅम्प जप्त केलेत. डीसीपी द्वारका एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, पालम भागातून पकडण्यात आलेल्या संशयितांचे नाव मोहम्मद मुस्तफा व मोहम्मद हुसैन आहे. या दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे.
15 ऑगस्टपूर्वी राजधानीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी मिळालेल्या गुप्त खबरीच्या आधारावर पोलिसांनी बांग्लादेशी नागरिकांच्या घरी धडा टाकली. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत त्यांच्याकडून 1 डझन पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयाचे 10 नकली स्टॅम्प जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांना याविषयी कोणतेही खास स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंजाबमध्ये रविवारी पाकच्या ISI पुरस्कृत अतिरेकी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी कॅनडा स्थित अर्श डल्ला व ऑस्ट्रेलिया स्थित गुरजंत सिंगशी संबंधित मॉड्यूलच्या 4 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींकडून 3 ग्रेनेड, एक आयईडी, दोन 9एमएम पिस्तूल व 40 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आसामच्या चराइदेव जिल्ह्यातील सोनारी येथून उल्फाच्या (आय) एका कॅडरला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल व अन्य शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा काही डाव होता काय याचा पोलिस तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारीच आनंद विहार भागातून शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीच्या 6 सदस्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून जवळपास 2 हजार जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला होता. एएसपी विक्रमजित सिंग यांनी सांगितले की, ही खेप लखनऊसाठी होती. प्राथमिक चौकशीत हा गुन्हेगारी नेटवर्कचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.
गुप्तहेर विभाग अर्थात आयबीने 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. विभागाने दिल्ली पोलिसांना एक 10 पानी अहवाल सोपवला आहे. त्यात स्वातंत्र्य दिनी अतिरेकी हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आयबीने आपल्या अहवालात या प्रकरणी जैश ए मोहम्मद व लश्कर ए तोयबासारख्या अतिरेकी संघटनांचे नाव घेतले आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने या दोन्ही संघटनांच्या म्होरक्यांना हल्ला करण्याचे निर्देश दिलेत.