खुनाच्या गुन्ह्यात अडीच वर्षांपूर्वी फरार दोघांना अटक

0

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात अडीच वर्षापासून फरार असणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथे नदीच्या पुलावरून मृतदेह दगड बांधून पाण्यात टाकून दिल्याची घटना घडली होती.

शंकर ब्रह्मदेव शिंदे (रा. ओटास्कीम, निगडी), रवी अशोक मोरे यांना अटक केली आहे. तर त्यांचे साथीदार अमोल वाले आणि मेघराज वाले यांच्यावर पोलिसांनी मोक्काची कारवाई करून त्यांना यापूर्वीच अटक केली आहे. सहदेव मारुती सोळंकी (रा. सावनगिरा ता.निलंगा जि. लातूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहदेव मारुती सोळंके हा दहा वर्षांपूर्वी त्याच्या गावातून पुण्याला पळून आला होता. त्यानंतर तो विश्रांतवाडी येथील एका हॉटेलमध्ये कामाला लागला होता. तिथे त्याला दारुचे व्यसन लागल्याने तिथले काम सुटले. काही दिवस भटकल्यानंतर तो चिंचवड स्टेशन येथील शंकर झेंडे उर्फ काक्या याच्या जग्गुभाई हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला लागला.

तिथे काम करताना त्याची आझाद मुल्लानी व शंकर ब्रम्हदेव शिंदे यांच्याशी ओळख झाली. शंकर झेंडे यांच्यासोबत पैशाच्या व्यवहारातून सोळंके याचा वाद झाला. त्यातून सहदेव सोळंके आणि आझाद मुल्लानी यांनी शंकर झेंडे याचा ऑगस्ट 2017 मध्ये वाहनाने ठोकर मारुन अपघात घडवून आणला. काही दिवसांनी तो खून असल्याचे उघड झाले आणि त्या खुनाच्या गुन्हयात आझाद मुल्लानी, सहदेव सोळंके यांना अटक झाली.

त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली. तिथून काही दिवसानंतर ते जामीनावर सुटल्यानंतर सहदेव हा सैरावैरा होवून कोणावरही दादागिरी करु लागला.

त्यामध्ये त्याचा मित्र शंकर ब्रम्हदेव शिंदे याला सुध्दा सतत दारु पिवुन शिवीगाळ करणे, लोकांमध्ये त्याचा अपमान करणे, दादागिरी करणे असे सहदेव हा करीत असल्याने शंकर शिंदे त्याच्यावर चिडून होता. शंकर शिंदे याने सहदेवला समजावून सांग, नाहीतर मी त्याला ठार मारणार, असे आझाद मुल्लानी याला सांगितले होते. परंतु सहदेवच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही.

ऑगस्ट 2018 मध्ये शंकर शिंदे याने त्याचे साथीदार रवि अशोक मोरे, अमोल बसवराज वाले, आणि राज्या उर्फ मेघराज संजय वाले यांना दारु पिण्यासाठी बोलावून घेतले. सहदेव हा शंकर शिंदे याच्यावर सतत दादागिरी करुन दारु पिवुन शिविगाळ करीत असल्याच्या रागातून त्याला ठार मारण्याचा या आरोपींनी दारू पिताना कट रचला.

त्यानंतर आझाद मुल्लानी याच्या वापरातील लाल रंगाच्या झायलो गाडी (एम एच 12 / जी व्ही 1852) मधून सहदेवला बाहेर जायचे असल्याचे सांगून त्याला एमआयडीसीच्या मोकळ्या जागेत घेऊन गेले. चारही आरोपींनी मिळून शिविगाळ करुन त्याला मारहाण केली.

त्यामध्ये सहदेव यानेही हातपाय मारल्याने शंकर शिंदे याने सहदेवच्या गळयात नॉयलायनची रस्सी टाकून रवि मोरे याने त्याचे दोन्ही हात धरले, मेघराज याने दोन्ही पाय दाबुन धरुन शंकर शिंदे व अमोल वाले यांनी नॉयलाईनची रस्सी दोन्ही बाजूने जोराने ओढून सहदेवचा गळा आवळुन खून केला.

सहदेवचा मृतदेह दिवसभर झायलो गाडीतच ठेवून दुस-या दिवशी रात्री मावळ तालुक्यातील परंदवाडी ते बेबडओहाळ गावच्या मध्ये असलेल्या पवना नदीवरील पुलावरून मृतदेहाला दगड बांधून नदीत टाकून दिला. दहा ते बारा दिवसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर आला.

त्यावेळी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या पॅन कार्डवरून त्याची ओळख पटविण्यात आली. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

या घटनेला अडीच वर्ष उलटल्यानंतर 8 फेब्रुवारी 2021 रोजी युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, हे आरोपी निगडी परिसरात फिरत आहेत. पोलिसांनी अंकुश चौकात सापळा लावून शंकर शिंदे आणि रवी मोरे यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याचे सांगितले. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार केराप्पा माने, दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, दिपक खरात, उषा दळे, जयवंत राऊत, वसंत खोमणे, विपुल जाधव, जमीर तांबोळी, नामदेव राऊत, अजित सानप, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.