गॅस चोरणाऱ्या दोघांना अटक; 34 लाखांचा ऐवज जप्त

0

पिंपरी :  एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूलमधून कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅस चोरणाऱ्या तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलिसांनी त्यांच्याकडून 34 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 3) पहाटे पावणे पाचच्या सुमारास येलवडी गावच्या हद्दीतील इंदोरी टोलनाक्याजवळ करण्यात आली.

गुरुदीप महलसिंग संधु (31 रा. सुरा. ता. जलना. जि. अमृतसर, पंजाब), रमेश ठक्कराम मंजु (21 रा. येलवडी ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस नाईक अजय मनमोहन गायकवाड (32) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे आरोपी येलवडी गावच्या हद्दीतील इंदोरी टोलनाक्याजवळ एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूल (एमएच 43 वाय 8865) मधून गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅसची चोरी करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून 34 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.