पुणे : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या देशेने जाणाऱ्या मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि.28) दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग ‘ब्लॉक’ केला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या दोन मार्गिका बंद करण्यात येणार असून एका मार्गिकेवरुन वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ‘ओव्हरहेड गॅन्ट्रीस्ट्रक्चर’ वर फलक (व्हेरिएबल मेसेज बोर्ड) बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिका बंद करुन एकाच मार्गावरुन वाहने जाऊ दिली जाणार आहे. या नियोजित वेळेत सर्व अवजड व मालवाहतूक वाहनांना प्रवास करता येणार नाही. केवळी हलकी चार चाकी व इतर प्रवासी वाहनांनाच या मार्गिकेवरुन संथ गतीने जाता येणार आहे.
महामंडळाकडून करण्यात येत असलेल्या या कामामुळे अवजड वाहने किलोमीटर 56.100 येथे थांबवण्यात येणार आहेत. फक्त हलक्या वाहनांना पुढे जाण्यास मुभा असणार आहे. या नियोजनासाठी महामार्ग पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती, महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक संजय सस्ते यांनी दिली. तसेच उद्या दोन तास वाहतूक बदल करण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.