महिलांना अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ची दोन विधायके विधानसभेत
अत्याचार करणाऱ्या नराधमांना २१ दिवसांत फाशी
मुंबई : महाआघाडी सरकारने महिला व बालकांवरील अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी नवीन कायदे तयार करण्याचे ठरवले आहे. यासाठी शक्ती कायद्याची दोन विधेयके गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी विधानसभेत मांडली. २१ दिवसांमध्ये खटल्याचा निकाल, बलात्कार, अॅसिडहल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडांची तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे.
आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा बनविण्यात आला आहे. विश्वासू किंवा जवळच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यास मृत्युदंड आणि १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कार या गुन्ह्यांतही मृत्युदंडाची तरतूद या विधेयकात आहे. महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठी मृत्युदंड आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
या विधेयकामध्ये महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठीच्या गुन्ह्यात १५ दिवसांत गुन्ह्याचा तपास आणि आरोपपत्र दाखल करावे आणि आरोपपत्र दाखल झाल्यावर ३० दिवसांत सुनावणी पूर्ण व्हावी, अशीदेखील तरतूद आहे.