पुणे : कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रूपयाची लाच शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात घेताना वनपाल आणि वनरक्षकास अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरूध्द शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सागर नवनाथ भोसले (34, पद – वनपाल, वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर, जि. पुणे) आणि संजय जयसिंग पाव्हणे (45, पद – वनरक्षक, वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची पिकअप गाडी सरपण भरून जात होती. त्यावेळी वनपाल सागर भोसले आणि वनरक्षक संजय पाव्हणे यांनी पिकअपला वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगून गाडीवर वनविभागाकडून कारवाई न करण्यासाठी 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत पुण्यातील अॅन्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीची दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये दोघेही लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले.
पुणे अॅन्टी करप्शनच्या पथकाने आज (दि. 18 नोव्हेंबर 2021) शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष भोसले आणि पाव्हणे यांनी तक्रारदाराकडून 1 लाख रूपयाची लाच घेतली. त्यावेळी त्यांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले. दोघांविरूध्द शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.