टाटा मोटर्स कंपनीत दोन हजार कामगारांचा चहा, नाश्ता आणि जेवणावर बहिष्कार

0

पिंपरी : टाटा मोटर्स कंपनीच्या कार विभागातील (कार प्लांट) कामगारांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून तीव्र असंतोष आहे. वेतनवाढ करारातील तरतुदी आणि जेवण व नाष्ट्याच्या वेळेतील बदल, यासह इतर कारणास्तव कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या चहा, नाश्ता आणि जेवणावर दोन हजारांहून अधिक कामगारांनी बहिष्कार घातला आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी कंपनीत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, त्या निष्फळ ठरल्या आहेत.

टाटा मोटर्सच्या कामगारांचा व्यवस्थापनाशी ३ मे २०२२ रोजी वेतनवाढ करार झाला. दर तीन वर्षांनी करार होण्याची ४० वर्षांची परंपरा यंदा खंडीत झाली. यंदापासून तो दर चार वर्षानंतर होणार आहे. हा बदल कामगारांना मान्य नव्हता. आमचा विरोध असतानाही संघटनेने तो मान्य केल्याची कामगारांची तक्रार आहे. कंपनीतील इतर विभागांचा वेतनवाढ करार झाला. त्याचपध्दतीने कार विभागाचा करार न झाल्याने असंतोष असतानाच, कामगारांच्या नाश्ता, चहासाठीची पूर्वीची वेळ बदलण्यात आली. त्यावरून नाराजीत भरच पडली.

कामगारांनी सुरूवातीला चहा, नाष्टा व नंतर जेवणावर बहिष्कार घातला. प्रारंभी नाराज कामगारांची संख्या मर्यादित होती. पुढे ती वाढत गेली. सध्या दोन हजारांच्या पुढे कामगारांनी बहिष्कार घातला आहे. त्यामुळे संघटना प्रतिनिधींकडून कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, नाराजीची तीव्रता खूपच जास्त असल्याने कामगारांकडून प्रतिसाद मिळत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.