दोन गावठी पिस्तुल, १० जिवंत काडतुसे जप्त

0
पुणे : नवरा-बायकोचा वाद पोलिस ठाण्याच्या दारात पोहचल्यानंतर घेतलेल्या झडतीत दोन गावठी पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे.

पोलिसांनी महिलेच्या पतीसह बारामतीतील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. बाळासाहेब उमाजी मदने (रा. चौधरीवस्ती) व सुग्रीव अंकुश भंडलकर (रा.बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील सुग्रीव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

चंदननगर पोलिस ठाण्यात एका महिलेने पतीविरुध्द घरगुती हिंसाचाराची तक्रार दिली होती. यावेळी तिने पतीकडे काडतुसे असल्याने आपल्या जीवाला भीती असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरी गावठी पिस्तुल असल्याचे सांगितले.

त्याच्या घराच्या झडतीत दोन काडतुसे, लोड केलेले एक पिस्तूल मिळून आले. यानंतर मदनेला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात आली. यामध्ये त्याने पिस्तूल व काडतुसे भंडलकर याच्याकडून ४० हजाराला विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांकडून दोन गावठी पिस्तुले, दहा काडतुसे आणि एक स्विफ्ट कार असा साडेतीन लाखांचा ऐवज हस्तगत केला.

Leave A Reply

Your email address will not be published.