सातारा : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक प्रचारानिमित्त भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी देशमुख यांच्या स्वागतासह मतदानाआधी विजयाचाही पेढा भरवला आहे.
यावेळी उदयनराजे म्हणाले, ‘मला भेटायला रोज हजारो लोक येतात. कोणी उमेदवार मला भेटला याचा अर्थ मी त्यांना पाठिंबा दिला असा होत नाही. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आमचे दरवाजे नेहमीच खुले असतात. आम्ही भाजपच्या उमेदवारांसोबतच आहोत,’
‘यापूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने पदवीधरांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. याची पोचपावती निश्चितपणे यंदाच्या निवडणुकीत मिळेल. उमेदवारांसह भाजप आणि मित्र पक्षांचे सर्व नेते, कार्यकर्ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करीत आहेत. निवडणुकीत निश्चित यश मिळेल,’ असा विश्वास खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ उपस्थित होत्या.