मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रते सोबत इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी पार पडली. यात न्यायालयाने दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 29 जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच या प्रकरणावर पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक केली आहे. विधिमंडळामध्ये जाऊन त्यांनी भाषण केलं पाहिजे होतं. आपलं मत काय, काय परिस्थिती झाली, काय आरोप झाले, हे सर्व अधिकृतपणे सदनामध्ये सांगायला पाहिजे होतं, असं चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यावर फुटलेल्या आमदारांनी विरोधात मतदान केलं असतं. मग अँटी डिफेक्शन लॉ-परिशिष्ट 10 लागू झाले असते. ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान केलं, ते सगळे अपात्र ठरले असते. पण तसं घडलं नाही. तलवार आधीच म्यान करण्यात आली. त्यामुळे राज्यपालांनी मग पुढे लार्जेस्ट मेजॉरिटी पार्टी होती, त्याला निमंत्रण दिलं. त्यामुळे माझ्या मते सध्या हे प्रकरण इंटरेस्टिंग झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट आता राज्यघटनेचा कसं सुसंगत अर्थ लावतो, हे देखील बघितलं पाहिजे, असे मत ज्येष्ठ वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केले.