पुणे : शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथ गुफेजवळ झालेल्या ढगफुटीत 15 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृृतांमध्ये पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे पुण्यातील पिंपरी येथील आणखी एका पुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
वडगाव बु. येथील सुनिता भोसले या त्यांचे पती आणि त्यांची नणंद यांच्यासोबत अमरनाथ यात्रेसाठी गेल्या होत्या. ढगफुटीच्या घटनेत सुनिता भोसले यांचा मृत्यू झाला. हे सर्व आळंदीतील माऊली ट्रॅव्हल कंपनीकडून अमरनाथ यात्रेला गेले होते. त्यांच्यासोबत 55 यात्रेकरू होते. मृतांचे पार्थिव जम्मूपर्यंत हेलिकॉप्टरने आणण्यात आले.
तसेच आळंदी येथील गुरुकृपा यात्रा कंपनीकडून आणखी 200 जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे 4 वाजता या घटनेच्या धक्क्याने हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर ते सर्वजण परतीचा प्रवासाला लागतील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.