व्यापाऱ्यांवरील एकतर्फी कारवाई खपवून घेतली जाणार नाही : खासदार बारणे
पिंपरी कॅम्पात वाहतूक पोलीस, वॉर्डनची संख्या वाढवावी
पिंपरी : सणांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी कॅम्पात वाहतूक पोलीस, वॉर्डनची संख्या वाढवावी. दिवाळीसह कोणत्याही सणात व्यापाऱ्यांना त्रास देवू नये. व्यापा-यांनीही कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवसाय करावा. हॉकर्स झोन लवकरच जाहीर केला जाईल. व्यापा-यांवरील एकतर्फी कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका, पोलीस अधिका-यांना दिला. खातरजमा करुनच कारवाई करावी. ते करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करू नका, सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यावर आजपासूनच कॅम्पात 48 अंमलदार आणि वॉर्डनची संख्या वाढविण्यात येत असल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल.
मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने पिंपरी कॅम्पातील व्यापा-यांच्या प्रश्नांसदर्भात मंगळवारी बी.टी. आडवाणी हॉलमध्ये बैठक झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, अर्जुन पवार, पिंपरी मर्चेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, माजी नगरसेवक डब्बू आसवानी, बाबा कांबळे, व्यापारी हरेश आसवानी, महेश मोठवानी आदी व्यापारी उपस्थित होते.
श्रीचंद आसवानी आणि माजी नगरसेवक डब्बू आसवांनी यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या. कॅम्पात वाहतूक आणि हॉकर्सचा महत्वाचा प्रश्न आहे. फेरीवाल्यांना हटवावे. कॉपी राईटबाबत रोज रेड टाकल्या जात आहेत. व्यापा-यांना विनाकारण त्रास दिला जातो. पिंपरी कॅम्प दाट लोकवस्ती झाला आहे. त्यामुळे कॅम्प परिसर गावठाण म्हणून घोषित करावा. मुख्य बाजारपेठेत मल्टी लेवल पार्किंग करावी. मार्केट परिसरात सतत पेट्रोलिंग करावे. बाबा कांबळे म्हणाले, ”व्यापाऱ्यांना त्रास होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. पण, फेरीवाल्यांनाही सांभाळून घेतले पाहिजे. आम्ही हट्टी, आडमुठेपणाची भूमिका घेणार नाही. फेरीवाल्यांचे पोट भरले पाहिजे. त्यांचे पुर्नवसन झाले पाहिजे”.
वाहतूकचे पोलीस निरीक्षक अर्जुन पवार म्हणाले, ”काही व्यापारी म्हणतात. शगुण चौकात गाड्या येऊ देऊ नका, पण गाड्या आल्या नाही. तर, ग्राहक येणार नाहीत. व्यापा-यांनी त्यांचा माल दुपारी बारा वाजेपर्यंत उतरून घ्यावा. जेणेकरुन सायंकाळी मालवाहतूक गाड्यांमुळे कोंडी होणार नाही. साई चौकातील भुयारी मार्गाच्या पलीकडे पार्किंगची व्यवस्था आहे. चारचाकी, मोठी वाहने तिथे थांबवतो. पण, दुचाकीस्वार आत येतात. कॅम्पातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 48 अंमलदार, तीन अधिकारी या भागात असतील. रस्त्यांवरील हॉकर्स झोनला बाजूला करून वाहतूक कोंडी कमी केली जाईल. लोकांनी वाहने पार्किंगमध्येच लावावीत. व्यापाऱ्यांनीही आपली वाहने तिथेचे लावावीत”.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, ”व्यापारी, फेरीवाले कोणावरही अन्याय होणार नाही याची पालिका काळजी घेत आहे. दुकानदार आणि फेरीवाले दोघांनाही न्याय द्यायचा आहे. व्यापा-यांनी दुकानसमोर काऊंटर वाढविले आहेत. त्यामुळे पादचारी रस्त्यावरून चालतात. परिणामी, वाहतूक कोंडी होते. त्यासाठी व्यापाऱ्यांनी काऊंटरसाठी फुटपाथचा वापर करू नये. फुटपाथ मोकळे ठेवावेत. लोक त्यावरून चालतील आणि वाहतूक कोंडी कमी होईल. क्रोमाच्या शेजारी पार्किंगची व्यवस्था केली आहे. नो-पार्किंग झोनवर कारवाईसाठी पोलिसांना पत्र दिले. 1 नोव्हेंबरपासून शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले जाईल. फेरीवाला क्षेत्र निश्चित करून फेरीवाल्यांना जागा दिली जाईल. कुठेही फेरीवाल्यांवर अन्याय होवू दिला जाणार नाही. त्यांनीही कुठेही व्यवसाय करू नये.
”पिंपरी बाजारपेठेत बीओटी तत्वार मल्टी पार्किंग विकसित केली जाणार आहे. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध केली होती. पण, निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यात सुधारणा करुन नव्याने निविदा प्रसिद्ध केली जाईल. जिथे पार्किंगचे नियोजन आहे, तिथे बीओटी तत्वावर मल्टी पार्किंग करण्याचा पालिकेचा मानस आहे. शासनाने प्लास्टिक धोरण आणले आहे. त्याला व्यापा-यांनी प्रतिसाद द्यावा. सिंगल युज, बंदी असलेले प्लास्टिक वापरू नये. पालिकेने शहरात कापडी पिशव्यांचे 80 ठिकाणी व्हेडिंग मशीन बसविले आहे. जास्तीत-जास्त लोकांपर्यंत कापडी पिशव्या पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. व्यापाऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी महापालिका नक्कीच प्रयत्न करेल”, असेही वाघ यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त मच्चक इप्पर म्हणाले, ”कॅम्पात वाहतूक कोंडीची समस्या आहे. पण, सर्वांनी स्वतः शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. त्याचे पालन केले तर प्रश्न सुटतील. व्यापारी दुकानासमोर माल ठेवतात, बोर्ड लावतात आणि पुढे वाहन पार्क करतात. त्यात पुढे हॉकर्स, हातगाडी असेल तर वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी स्वयंशिस्त महत्वाची आहे. दुकानदारांनी डिस्प्ले बोर्ड पुढे येवू देवू नयेत. दुकानादार, ग्राहकांनी पार्किंगमधेच वाहने लावावीत. कॉपी राईट्स करु नये. कोणावर अन्याय होणार याची दक्षता घेतली जाईल. महापालिकेसोबत समन्वय ठेवून हॉकर्स, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू, पण सर्वांनी स्वयशिस्त पाळावी”.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”कोरोनामुळे दोन वर्षे व्यापा-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता कोणत्याही व्यापाऱ्याला, दुकानदाराला महापालिका, पोलिसांकडून त्रास होणार नाही. व्यापाऱ्यांनीही चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करू नये. कॉपी राईट्सबाबत एकतर्फी कारवाई करु नये. पिंपरीत अनेक वर्षांपासून पार्किंगची समस्या आहे. त्यासाठी एच ए ची जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सणासुदीच्या काळात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी. महापालिकेनेही वॉर्डन ठेवावेत. व्यापा-यांनी प्लास्टिकचा वापर करु नये. छोटा-मोठा व्यवसाय करणा-यांनी वाहतूक कोंडी करून व्यवसाय करू नये. व्यवसाय करण्यास कोणाचाही विरोध नाही. पण, कोणाला त्रास देवून व्यवसाय करणे चुकीचे आहे. शगुण चौकातील रस्ता मोठा करण्यासाठी दुकानांवर कारवाई केली. पण, त्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसून येत नाही”.
”पिंपरी बाजारपेठ मोठी असल्याने कॅम्पात दाट लोकवस्ती झाली आहे. पिंपरी कॅम्प मार्केट परिसर गावठाण म्हणून घोषित करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह सकारात्मक आहेत. त्यामुळे व्यापा-यांचे प्रश्न मार्गी लागण्यात कोणतीही अडचण येणार नाही. एका बाजूने समस्या निर्माण होत नाही. दोनही बाजूने नियमांचे उल्लंघन झाल्यास समस्या निर्माण होतात. त्यामुळे सर्वांनीच नियमांचे पालन करावे. यापुढे व्यापा-यांना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास तत्काळ प्रशासनासोबत बैठक घेतली जाईल. तसेच ज्या सिंधी बांधवांना सनद मिळाली नाही. त्यांना लवकरच सनद मिळेल”, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.