मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी खोटे आरोप केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंनी दिशा सालीयन बाबत केलेल्या विधानांमुळे त्यांना ४ मार्च रोजी चौकशीसाठी हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वी नारायण राणे व त्याचा मुलगा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालीयन हीच्याबाबत वक्तव्य केले आहे. दिशा सालियनच्या पालकांनीही आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यावर राजकारण केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती.
या सर्व गोष्टींबाबत मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे .
”दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे व नितेश राणे हे दिशा सालियनसोबत मृत्यूपूर्वी झालेल्या बलात्काराबाबत नेहमीच विधान करीत आहेत.
मालवणी पोलीस ठाण्यातून महिला आयोगाने दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा समावेश आहे. दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा शवविच्छेद अहवालामध्ये उल्लेख नाही. यानंतर नारायण राणे यांच्यावर महिला आयोगाने खोटे आरोप केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.