पिंपरी : बावधन येथे अज्ञात इसमाचा गळा दाबून खून करण्यात आला. मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकून दिला. याचा उलगडा हिंजवडी पोलिसांनी केला आहे. किरकोळ वादातून बिगारी काम करणाऱ्याचा खून त्याच्या साथीदारांनी केला. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
राजु दिनानाथ महातो (36, रा. बावधन, पुणे, मुळगाव – खलदार, कोलकत्ता) असे खून झालेल्या या इसमाचे नाव आहे. तर सुनील मुना चौहान (26, रा. बावधन, मुळगाव बिहार), मुन्ना फुनी चौहान (40), योगेंद्र श्रीगुल्ले राम (40, मुळगाव उत्तर प्रदेश) आणि बलिंदर श्रीगुल्ले राम (36) यांना मंगळवारी (दि.19) अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महातो हे आरोपी यांच्या सोबत बिगारी काम करायचे, महातो यांचा आरोपी सुनील मुना चौहान याच्याशी वाद झाला. त्यातून सुनील याने गळा आवळून महातो याचा खून केला. इतर आरोपींनी मृतदेह दोरीने बांधून गोणीत भरला व बावधन येथील पुणे – मुंबई हायवे लगत असलेल्या नाल्यात फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
हिंजवडी पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या चारी दिशांना असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले. तसेच, आजुबाजुला असलेले 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये दोन इसम दुचाकीवरून पांढ-या पोत्यात काहीतरी घेऊन जाताना दिसले. याबाबत माहिती घेतली असता ही दुचाकी बावधन येथील एका इसमाची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी याठिकाणी जाऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सोन्याबापू देशमुख, तपासी पथकाचे सहायक निरीक्षक राम गोमारे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.