नवी दिल्ली : हाथरस प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. बदायू जिल्ह्यामध्ये मंदिरात गेलेल्या एका महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे नराधमांनी महिलेच्या गुप्तांगामध्ये कठीण वस्तू टाकलेली आहे.
पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप केलाय की, तक्रार दाखल करुनही उघैती पोलिस स्टेशनचे ऑफिसर रविंद्र प्रताप सिंह हे वेळेवर पोहोचले नाहीत. या पीडितेचा मृतदेह मृत्यूनंतर तब्बल 18 तासांनी म्हणजे सोमवारी दुपारी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. मंगळवारी आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, या पीडितेच्या गुप्तांगांच्या ठिकाणी अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या महिलेची बरकडी तसेच पाय मोडला होता. तसेच तिच्या फुप्फुसावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. तसेच तीव्र रक्तस्त्राव देखील होत होता.
पोलिसांनी याबाबत सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार जणांची टीम बनवली आहे. या घटनेतील संशयित आरोपी महंत बाबा सत्यनारायण, त्याचा सहाय्यक वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल यांचा शोध सुरु आहे. अद्याप एकही अटक झालेली नाहीये.