नवी दिल्ली : देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच सोबत लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरू आहे. मात्र अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे. यावर केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार कोरोनाविरुद्धची लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 12.7 कोटी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकूण 1.1 कोटी कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आलेत. कोव्हॅक्सिनचा पहिल्या डोस 93, 56, 437 जणांना दिल्यानंतर यातील 4 हजार 208 म्हणजेच 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. तर दुसऱ्या डोसनंतर देखील 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर येत आहे. तर तिकडे कोव्हिशिल्डचे आतापर्यंत एकूण 11.6 कोटी डोस देण्यात आले आहेत.
कोव्हिशिल्डचा पहिला डोस 10 कोटी 3 लाख 2 हजार 745 जणांना दिल्यानंतर यातील 17 हजार 145 म्हणजेच 0.02 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे, कोव्हिशिल्डचा दुसऱ्या डोस घेतल्यानंतर 0.03 टक्के जणांना कोरोना झाला आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस एकूण 1 कोटी 57 लाख 32 हजार 754 जणांना दिल्यानंतर यातील 5 हजार 14 जणांना कोरोना झाल्याचं समोर येत आहे.