वहिनी, तुम्हाला ‘सामना’ची भाषा योग्य वाटते का?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संपादक रश्मी ठाकरे यांना पाठविले पत्र
मुंबई ः शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै. सामनामधून नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांबद्दल खालच्या स्तरावर जाऊन वापरली जाणारी आपल्याला योग्य वाटते का, असा प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दै. सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून विचारला आहे.
“गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांबद्दल खालच्या स्तरावरील भाषा वापरली जाते. वहिनी, आपण सामनाच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापून येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा, या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. मी आपणास एक व्यक्ती म्हणून चांगले ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल”, अशा आशयाचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी लिहिले आहे.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, “दै. सामनाच्या संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरात येणाऱ्या भाषेचा विचार करावा, अशी आपणास विनंती आहे. माझी ही विनंती आपणास योग्य वाटत नसेल आणि आपल्या वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल, तर तुम्ही खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा”, असेही चंद्रकांत पाटील यांनी संपादक रश्मी ठाकरे यांना पत्रातून म्हणाले आहेत.