जिना चढण्याचा त्रास नको म्हणून मंत्र्यासह ताफ्यातील वाहने अॅथलेटिक्स धावपट्टीवर

क्रीडामंत्र्यांनी ही गोष्ट हसण्यावर घालवली

0

पुणे : क्रीडामंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी चक्क अॅथलेटिक्सच्या कृत्रिम धावपट्टीवर वाहने आणण्यात आली. पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत मंत्री व इतर मान्यवरांना दोन मजले चढावे लागू नयेत, म्हणून हा पर्याय वापरल्याचे समोर आले आहे.

क्रीडा विद्यापीठाच्या तयारीसाठी या इमारतीमध्ये शनिवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैठकीला ऑलिंपिक संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह क्रीडा सचिव, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त उपस्थित होते.

मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. स्टेडियमची अॅथलेटिक्सची धावपट्टी दुसऱ्या मजल्याला समांतर आहे. मंत्री महोदयांना लिफ्टने जाण्याचाही त्रास नको म्हणून या धावपट्टीवर थेट गाड्या आणून, नवीन पराक्रमच केला आहे. मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती.

विशेष म्हणजे स्टेडियमचा वापर खेळाशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी करण्यात येणार नाही, अशा घोषणा करणाऱ्या क्रीडामंत्र्यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यावर त्यांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅकची वाट मंत्री आणि अधिकारी लावताना दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.