पिंपरी : हिंजवडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा प्रकार समोर आलेला आहे. तसेच अनेकांची होणारी फसवणूक टळली आहे. कमी कागदपत्रात १ कोटी ते १०० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देतो असे आमिष दाखवणाऱ्या एका महिलेसह तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकवरून कर्जाची आकर्षक पोष्ट, जाहिराती टाकून आरोपी कर्ज हव्या असणाऱ्या व्यक्तींना जाळ्यात ओढत होते, तशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.
या प्रकरणी महिला मॅनेजर राधिका यतीश आंबेकर, संदीप रामचंद्र समुद्रे आणि जयजीत रामसनेही गुप्ता ला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. जलाराम इंटरप्राइजेस प्रायव्हेट फंड नावाच्या कंपनीमार्फ़त कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केली जायची. संबंधित कंपनी आरोपी समुद्रे हा चालवत होता. आरोपीकडून १३ कॉम्प्युटर, ७ मोबाईल आणि कर्जाची काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीराम प्रल्हाद पिंगळे यांनी फेसबुक मार्फत जलाराम कंपनी कोट्यवधींचे कर्ज देते अशी पोष्ट, जाहिरात पाहिली. पिंगळे यांनी जाहिरातीवर दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन लावून अधिक माहिती घेतली. तक्रारदार यांना बाणेर येथील जलाराम इंटरप्राइजेस प्रायव्हेट फंड कंपनीत अधिक माहितीसाठी बोलावण्यात आले. तिथे, त्यांना १ कोटी रुपयांचे लोण हवे असल्यास तुम्हाला ५ ते ११ लाख रुपये रोख रक्कम द्यावी लागेल, ती सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु, यात काहीतरी गोलमाल आहे, असे लक्षात आल्याने त्यांनी याबाबतची माहिती हिंजवडी पोलिसांना दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी याबाबत खात्री केली, तेव्हा ते चालवत असलेली कंपनी बेकायदेशीर असल्याचे आढळले. पोलिसांनी बाणेर येथील जलाराम कंपनीत जाऊन विचारपूस केली तेव्हा तिथे सात महिला काम करत असल्याचे समोर आले. संबंधित कंपनी आरबीआयच्या गाइडलाईन्स नुसार रजिस्टर नसल्याचेही समोर आले. त्यानंतर पोलिसांनी महिला मॅनेजर असलेल्या राधिकाला बेड्या ठोकल्या. अधिक तपास केला असता संबंधित कंपनी ही संदीप समुद्रे चालवत असून जयजीत गुप्ता हा प्रो. प्रा. असल्याचे पुढे आले. आरोपींचे शिक्षण हे दहावीदेखील झालेले नसून ते १ ते १०० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ असे आमिष दाखवत.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी अशा आकर्षक जाहिरातींना बळी पडू नये, खात्री करावी मगच पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी नागरिकांना आहे. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सोन्याबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, देशमुख आणि पोलीस कर्मचारी केंगले, कुदळ, नरळे यांनी केली आहे.