पिंपरी : बारणेंना कुणीतरी सांगा माझं अवघं कुटुंब राजकारणी आहे. मला पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सर्वजण ओळखतात. तरी देखील ते मान्य करत नसतील तर बारणेंनी अभ्यास करावा. मगच माझ्यावर बोलावं असं सडेतोड प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिलं आहे.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विरोधकांना पराभव दिसत असल्याने अशी वक्तव्य करत आहेत, अशी टीका केली होती. तसंच बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं. यावर पुन्हा एकदा संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणेंवर निशाणा साधत प्रतिउत्तर दिलं आहे.
वाघेरे म्हणाले, बारणेंना सांगा, माझी पत्नी तीन वेळा निवडून आलेली आहे. मी महापौर होतो, माझे वडील महापौर होते. या गावचे ते सरपंच ही होते. हे सर्व बघता बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर वाघेरे यांनी बारणेंना दिलं आहे. दिवसेंदिवस वाघेरे आणि बारणे यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.