पिंपरी :
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पडघम जोर धरु लागले आहेत. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शहराच्या राजकारणात पहिली ठिणगी वाकडमध्ये (प्रभाग क्रमांक- २५) पडली. वाकडमधील रस्ते आता बोलू लागलेत… म्हणाताहेत आता हवा नगरसेवक नवा..!
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २५ मधून २०१७ मध्ये शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका अश्विनी वाघमारे, नगरसविका रेखा दर्शिले आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे निवडून आले आहेत.
ताथवडे- पुनावळे- काळाखडक आणि वाकड आदी परिसराचा समावेश असलेल्या भागात गावठाण आणि सोसयटी सदनिकाधारक मतदारांचा प्रभाव आहे. स्थानिक ग्रामस्थांसोबत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठी-अमराठी मतदान, आयटीयन्सचा मतदार या ठिकाणी निर्णायक मानला जातो. पुणे-मुंबई जलदगती महामार्गाच्या दोन्ही बाजुला असलेल्या या प्रभागामध्ये शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपा कार्यकर्त्यांचे जाळे तगडे आहे.
गेल्या पाच वर्षांतील नगरसेवकांनी विकासकामांकडे दुर्लक्ष केले असून, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
…असे आहे प्रभागातील राजकीय गणित
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपाकडून सावित्री गायकवाड, सीमा आल्हाट, राम वाकडकर, विशाल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सोनाली ओव्हाळ, शीतल भूमकर, मयूर कलाटे, संदीप पवार यांनी निवडणूक लढवली होती. तसेच, शिवसेनेकडून राहुल कलाटे, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले, संतोष पवार यांनी मैदानात उडी घेतली होती. या प्रमुख पक्षांपैकी शिवसेनेचे कलाटे, दर्शिले, वाघमारे आणि राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांनी निवडणूक जिंकली आहे.
विद्यमान नगरसेवकांचे अपयश : राम वाकडकर
भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर म्हणाले की, विद्यमान नगरसेवकांनी निवडणुका संपल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे विद्यमान नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले. आरक्षण विकसित न करता नगरसेवकांनी रस्ते अडवले आहेत. वाकड- डांगेचौक हा ४५ मीटरचा रस्त्यावर अक्षरश: फूटपाथही नाही.