पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची २०२२ ची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार हे नक्की नाही. ती पावसाळ्यांनंतर होईल असा अंदाज आहे. तरीही त्यासाठीची सर्व तयारी प्रशासनाने आताच केली आहे. या तयारीचा शेवटचा भाग व टप्पा म्हणून प्रभागनिहाय मतदारयादी पालिका आय़ुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आज जाहीर केली. पण, त्यात चुका असतील, अशी शंका प्रशासनानेच लगेच व्यक्त केली. त्यामुळे ती बिनचूक होण्यासाठी त्यांनी १ जुलैपर्यंत त्यावर मतदारांच्या हरकती व सुचना मागवल्या आहेत.
दरम्यान, २०१७ च्या पिंपरी पालिका निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीतील मतदारांची संख्या तीन लाखांनी वाढली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ मे २०२२ पर्यंतची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरू ही प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी आज प्रसिद्ध करण्यात आली.
मात्र विधानसभा मतदारयादीत नाव असूनही ते प्रभागयादीत नसणे, प्रभाग बदलणे अशा चुका राहिल्या असण्याची शक्यता प्रशासनानेच लगेच व्यक्त केली. म्हणून ही यादी बिनचूक होण्याकरिता १ जुलैपर्यंत त्यावर हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. त्या प्रत्यक्ष मतदारांनीच करायच्या असल्याचे पालिकेचे निवडणूक कक्ष प्रमुख तथा सहाय्यक आय़ुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले. हे काम करताना नव्याने मतदाराचे नाव मतदारयादीत टाकले जाणार नाही वा ते वगळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात चिंचवड, भोसरी आणि पिंपरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवड हा सर्वाधिक मोठा आहे. मात्र नवीन मतदारनोंदणी ही अधिक भोसरीत (२७,२५२) झाली आहे. तर, पिंपरीत ती सर्वात कमी (६,६६८) नोंदवली गेली आहे. २०१७ पेक्षा यावेळच्या (२०२२) मतदारयादीत तीन लाख नव्या मतदारांची भर पडल्याने ही एकूण संख्या १५ लाख ६९३ वर गेली आहे. त्यात आठ लाख ३९४ पुरुष, सहा लाख ८७ हजार ६४७ महिला, तर ८८ इतर मतदार आहेत. गतवेळी चार सदस्यांचे ३२ प्रभाग होते. यावेळी तीनसदस्यीय पद्धतीने ही निवडणूक होणार असल्याने ही संख्या ४६ वर गेली आहे. त्यातील ३८ नंबरचा प्रभाग हा सर्वात मोठा असून तेथे ५२,६४८ मतदार आहेत. तर, सर्वात लहान प्रभाग हा ३८ चा शेजारी ३७ हा आहे. तेथील मतदारांची संख्या २१,१०२ आहे.