पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरावर ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावर गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारत, तसेच राज्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे.
राज्यात पावसाची संततधार गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू आहे. या पावसाने राज्यात जुलैची सरासरी ओलांडली आहे. कोकण, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा,कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.
राज्यातील कोकणातील रायगडमध्ये मंगळवार व बुधवारी, तसेच गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूरमध्ये मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे,
तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातार्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.