कुत्र्यांच्या नसबंदीत सोन्याचे उपकरण वापरले होते का? : अजित पवार

0

पिंपरी : मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजपला नागरिकांच्या हिताची कामे करता आलेली नाहीत. भाजपने कमिशन मिळणारी कामे केली. कुत्र्यांच्या नसबंदीत कमिशन मिळविले. साडेसहा कोटी रुपयांची कसली नसबंदी केली. ती ही लॉकडाऊनच्या कालावधीत, सोन्याचे उपकरण वापरले होते की काय? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज (शुक्रवारी) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळावा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, मंगला कदम, माजी नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडकारांकरिता पाणी आणता आले नाही. भाजपने पाच वर्षे काय केले, अजून दररोज पाणी देऊ शकत नाहीत. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार आहेत. मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 100 नगरसेवक निवडून द्या. शहरवासीयांना दररोज पिण्यासाठी पाणी देण्यासह सर्व प्रश्न मार्गी लावून दाखवतो, अशी हमी पवार यांनी दिली.

शहरात सध्या इव्हेंट सुरु झाले आहेत. जेसीबी, बोलोरो देत आहेत. यांचे काही खरे नाही. लबाडा घरचे अवतान आहे. जेवल्याशिवाय कळत नाही असे म्हणत भाजप आमदार महेश लांडगे यांनाही टोला लगाविला.

Leave A Reply

Your email address will not be published.