नवी दिल्ली ः “देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत. २०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलंच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं. करोना लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून भारतात तयार झालेली करोना लसच नागरिकांना मिळेल”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
गुजरातमधील राजकोटमधील एम्स हाॅस्पिटलटच्या भूमिपुजनावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे. २०२१ मध्ये आपल्याला आरोग्य सेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल. २०१४ मध्ये आपलं आरोग्य क्षेत्र वेगळ्याच दिशेला होतं. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून काम केलं जात होतं. प्राथमिक आरोग्य केंद्राचाही वेगळीच प्रणाली होती. गावात योग्य सुविधा मिळत नव्हत्या”, असे सांगत मोदींनी काॅंग्रेसवर निशाणा साधला.
“भारताने योग्य वेळेत पाऊलं उचलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात १ कोटी लोकांनी करोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. २०२० मध्ये करोनामुळे निराशा होती. चारही बाजूला अनेक प्रश्न होते. पण आता २०२१ नवी आशा घेऊन येत आहे”, असे मत नरेंद्र मोदींनी मांडले.