मुंबई : आम्हीच खरे शिवसैनिक आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्ही अपात्र ठरु शकत नाही, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु करत शिंदे गटावर टिकेची झोड उठवली आहे. त्याला केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
केसरकर म्हणाले, शिवसेनेत आमदारांनी केलेल्या उठावानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, आता कट्टर शिवसैनिकांचा अपमान करण्यात येत आहे. त्यांना गद्दार म्हटले जात आहे. कट्टर शिवसैनिकांमुळेच शिवसेना ताठ मानेने उभी आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा अपमान करू नका. शिवसैनिक दूर गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी यात्रा सुरू केल्या आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. आम्ही आदराने बोलतो. तुम्हीदेखील आदाराने बोला.
आम्ही तुमच्यामुळे निवडून येत नाही. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची धमकी देऊ नका, असा इशाराच केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. केसरकर म्हणाले, आमचे सर्व आमदार हे शिवसेनेच्या नव्हे तर स्वत:च्या ताकदीवर निवडून येतात. त्यामुळे आमचा अपमान करुन लोकांना भावनिक आवाहन करणे थांबवा. अन्यथा आमच्या मतदारसंघातील जनता तुमच्याविरोधात पेटून उठेल. शिंदे गटावरील आमदारांवर अन्याय हा त्यांच्या मतदारसंघातील जनतेवरही अन्याय आहे.