मुंबई ः “जर कोणी अजितदादांना त्यांच्या पक्षात सहभागी होण्याचे वचन दिलं असेल, तर त्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. काही लोकांनी आम्हाला देखील वचन दिलं आहे. परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही, आम्ही ते करतो. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आणि शिवसेनेकडे गेलेल्या नेत्याचं आम्ही स्वागत केलं”, असे प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार या अगोदर म्हणाले होते की, “भाजपामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांना असे वाटले होते की, भाजपा सत्तेत येईल तेव्हा त्यांचे ऐकले जाईल. आता त्यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आहे, कारण त्यांची कामं झाली नाहीत. पुणे व पिंपरी चिंचवडमधील काही नेत्यांना परत यायची इच्छा आहे. त्यांचे लवकरच स्वागत करण्यात येईल”, असे पवार म्हणाले होते.
त्यावर प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पाटील पुढे म्हणाले की, “अजित पवार जर इतरांच्या आमदारांबद्दल बोलत असतील तर त्यांच्यासोबतचे २८ आमदार का टिकले नाहीत? याचे त्यांनी उत्तर द्यावे. जर त्यांच्यासोबतचे २८ आमदारच टिकले नाहीत तर इतर पक्षांतील आमदार त्यांच्याकडे कसे येतील?”, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.