नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सीमावादावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
बेळगावात लोकप्रतिनिधींना जाऊ दिलं जात नाहीय, तर तिथले मुख्यमंत्री उघड उघड महाराष्ट्राची बदनामी करणारी विधानं करत आहेत तरी सरकार काही बोलत नाही असा हल्लाबोल शिंदे सरकारवर केला. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत सीमावादाबाबत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीची सविस्तर माहितीच सभागृहात दिली.
“सीमाभागातील बांधवांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. या गोष्टीचं राजकारण केलं जाऊ नये. राजकारण करण्यासाठी इतर बरेच मुद्दे आहेत. पण या प्रश्नावर आजवर कोणत्याच केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतली नव्हती. अमित शाह यांनी यात लक्ष घालून मध्यस्थी केली. यावेळी मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बाजू तिथं मांडली. यात बोम्मईंकडून केली जाणाऱ्या ट्विट्सचाही मुद्दा उचलला. त्यावर बोम्मईंनी ते ट्विटस आपण केलेली नसल्याचं म्हटलं. तसंच ते ट्विट कुणी केलीत याचीही माहिती त्यांच्या सरकारनं शोधून काढली आहे. तसंच या ट्विट्समागे कोणता पक्ष आहे याचीही माहिती कळाली आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा तिथल्या बांधवांच्या पाठिशी कसं उभं राहता येईल हे पाहायला हवं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.